सेवा मंडळा विषयी

‘संहति: कार्यसाधिका’ हे बोधवाक्य स्विकारुन त्यानुसार सर्वांना सोबत घेऊन सामाजिक उत्थानासाठी कार्यरत असलेली कऱ्हाडे ब्राह्मण सेवा मंडळ, डोंबिवली जि. ठाणे ही धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणी झालेली संस्था गेली ५५ वर्षे ठाणे जिल्हा व आजूबाजूच्या परिसरात विविध समाजोपयोगी उपक्रम राबवित आहे.

स्थापना

७० च्या दशकात डोंबिवलीमध्ये अंदाजे २५० कऱ्हाडे कुटुंबं रहात होती. त्यावेळी बरीचशी मंडळी कऱ्हाडे ब्राह्मण संघ मुंबईचे सभासद होते. त्यावेळी कै. श्री. पांडुरंग गणेश भडकमकर यांच्या मनात विचार आला की, एवढ्या मोठ्या संख्येने आपले लोक येथे वास्तव्य करून असताना डोंबिवलीला आपली संस्था का असू नये? त्यांचे मन त्यांना स्वस्थ बसू देईना, आणि मग श्री. शरद वामन पुसाळकर यांना बरोबर घेऊन त्यांनी सर्व डोंबिवली अक्षरश: पिंजून काढली. सर्व कऱ्हाड्यांना आपला मानस सांगून एकत्र आणले. विचार तर सर्वांनाच पटला. त्यानंतर १-२ वेळा एकत्र जमून चर्चा केल्यावर दि. २५/०८/१९७१ रोजी श्री. राजाराम केशव करंबेळकर यांच्याकडे पहिली सभा होऊन त्यामध्ये अशी संस्था स्थापन करण्याचा औपचारिक निर्णय घेण्यात आला. आणि एक अस्थायी समिती स्थापन करुन प्रत्यक्ष कार्याचा शुभारंभ झाला. आज संस्थापक सदस्य कै. पांडुरंग गणेश भडकमकर आणि श्री. शरद वामन पुसाळकर यांनी लावलेल्या या रोपट्याचे आपण सर्व सदस्यांच्या प्रामाणिक प्रयत्नाने वटवृक्षात रुपांतर झाले आहे, ही एक अत्यंत आनंदाची व अभिमानाची गोष्ट आहे.   

एखादे अंतिम ध्येय हा केंद्रबिंदू ठरवून सतत कार्यरत राहिले की संस्था कशी उमलते आणि विस्तारते याचे प्रत्यक्ष उत्तम उदाहरण म्हणजे “कऱ्हाडे ब्राह्मण सेवा मंडळ, डोंबिवली” होय.

   ज्ञाती विरहीत विकासाबरोबर ज्ञातीबांधवांना एकत्र आणण्यातही संस्थेने पुढाकार घेतला व त्यातुनच कऱ्हाडे ब्राह्मण महासंघ, पुणे आणि ब्राह्मण महासंघ डोंबिवली यांचे पितृत्व्ही  यशस्वीपणे निभावले.

ध्येय

   संस्थेच्या कार्यकर्त्यांचे अविरत अथक परिश्रम आणि दांडगा जनसंपर्क याचे फलित म्हणजे संस्थेची स्वतःच्या मालकीची वास्तू. संपूर्ण समाजाचे उत्थान हे संस्थेचे ध्येय असल्यामुळे या वास्तूचे  “समाजमंदिर” असे यथोचित नामकरण करण्यात आले. संस्थेनचे ध्येय ठरवल्यानंतर समाजाच्या सर्वकष उत्थानासाठी आवश्यक असलेले शिक्षण, आरोग्य, कुटुंब कल्याण या विषयांशी निगडित अनेक उपक्रम राबवण्यास सुरुवात झाली.

कल्पना करा की माझ्याकडे मूठभर आहे, त्यातले चिमूटभर कमी झाले तर मी उपाशी राहणार नाही, पण तीच एक चिमूट कोणाच्यातरी भुकेचा आधार ठरेल. आर्थिक अडचणींमुळे अर्धवट सोडावे लागणारे शिक्षण पूर्ण करण्यास मदत होईल, कोणा रुग्णाला आयुष्य-आरोग्य मिळवून देईल. सर्वात महत्वाचे म्हणजे ती एक चिमूट एक सुरक्षित, सशक्त समाज उभारण्याच्या कामाचे समाधान आपणास मिळवून देईल.